1.2-Androcles and the Lion
अन्ड्रोक्लस आणि सिंह :
खूप खूप वर्षांपूर्वी, अॅन्ड्रोक्लस नावाचा एक दयाळू, प्रेमळ आणि विवेकी माणूस होता. पण त्याचा मालक मात्र अतिशय दुष्ट होता. त्या काळी,राजे-महाराजे आणि तत्सम श्रीमंत लोक गरीब लोकांना आपले गुलाम बनवून ठेवत असत. अॅनड्रोक्लस एक गुलाम होता. या गुलामांना त्यांचे मालक जबरदस्तीने कामाला जुंपत असत. मालक जे सांगतील ते त्यांना करावे लागत असे. त्यांना कोणतेही स्वातंत्र्य नसे, कोणतेही अधिकार नसत. अगदी मालक त्यांचाशी गैरवर्तन करीत असेल तरी त्याला सोडून जाता येत नसे.मालक कितीही क्रूरपणे वागला, तरी त्याची आज्ञा पाळणे हे त्यांच्यासाठी कायद्याने बंधनकारक असे.अन्ड्रोक्लसला त्याचा निर्दयी, निष्ठुर मालक
अजिबात आवडत नसे. तो गुलामांना उपाशी ठेवीतअसे आणि चाबकाचे फटके मारीत असे. अशा मालकाची सेवा करण्यापेक्षा मरण ओढवलेले बरे, असे अन्ड्रोक्लसला वाटे. तो चांगल्या संधीची वाट पाहत राही. अखेर एकदा संधी मिळताच तो क्रूर मालकाच्या कचाट्यातून सुटण्यात यशस्वी झाला.अॅन्ड्रोक्लस जरी पळून गेला असला तरी तो भ्याड नव्हता. तो जंगलात लपून बसला. जंगलात फिरणाऱ्या श्वापदांचे त्याला भय नव्हते. डोक्यावर छप्पर नाही
याची त्याला चिंता नव्हती. एखाद्या पक्ष्याप्रमाणे मर्जी होईल तिथे जायला आपण मुक्त आहोत याचा त्याला
जास्त आनंद होता.
एके दिवशी, जंगलात फिरत असताना अचानक एक सिंह त्याच्यासमोर आला. मागे फिरून पळून जावे असे त्याला प्रथम वाटले. पण त्याला बघून सिंह हलला नाही, गुरगुरला नाही की त्याने डरकाळीही फोडली नाही, हे त्याच्या लक्षात आले. किंबहुना, जणूवेदनेने केविलवाणे होत तो त्याच्याकडे पाहत होता. अॅन्ड्रोक्लस थबकला आणि एक-एक पाऊल पुढे टाकीत, तो सावधपणे सिंहाकडे जाऊ लागला. सिंह
कण्हत, विव्हळत होता आणि त्याचे डोळे 'कृपया मला मदत कर' अशी जणू याचना करीत होते.
अॅनड्रोक्लस जवळ पोहोचला तेव्हा सिंहाने आपले डोके खाली वळवले आणि पंजा चाटायला सुरुवात केली. तेव्हा त्याला दिसले की सिंहाच्या पंजाला जखम झाली होती आणि तो सुजला होता.जवळ जाऊन पाहिल्यावर अॅन्ड्रोक्लसला दिसले की एक मोठा काटा त्याच्या एका बोटात घुसला होता.
'सिंहाच्या वेदनेचे हे कारण आहे तर,' अॅनड्रोक्लस स्वतःशी पुटपुटला.आपले सगळे धैर्य एकवटून अॅन्ड्रोक्लसने आपला हात हळूच सिंहाच्या जखमी पंजाकडे नेला. सिंहाच्या दुखऱ्या पंजाला हात लावला तर तो आपल्यावर हल्लाकरील की काय, अशी त्याला भीती वाटत होती; पण सिंहाला त्याचा सद्हेतू समजला असावा.
अॅन्ड्रोक्लसने (सिंहाचा) पंजा आपल्या डाव्या हातात घेतला. शिताफीने त्यातला काटा ओढून काढला आणि अंगावरच्या कपड्याचा एक तुकडा फाडून त्याची पट्टी त्या कनवाळू मनुष्याने सिंहाच्या जखमी पंजावर
बांधली. आणि काय आश्चर्य! जणू कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सिंहाने त्याचा हात चाटला.
सिंहाला पुन्हा चालता येईपर्यंत अॅन्ड्रोक्लस त्याच्याजवळच राहिला. तो जंगलात जाऊन शिकार करीत असे आणि त्या असहाय्य श्वापदाबरोबर आपले अन्न वाटून खाई. सिंहाची जखम स्वच्छ करून तो रोज त्याला मलमपट्टी करीत असे. लवकरच सिंह हिंडूफिरू लागला. बरेचदा अॅनड्रोक्लस जिथे जाईल
तिथे सिंहही त्याच्या पाठोपाठ जाई. दरम्यान, अॅनड्रोक्लसच्या मालकाने आपला गुलाम पळून गेल्याची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे केली. अॅन्ड्रोक्लसला पकडून आणण्यासाठी सर्व दिशांना सैनिक पाठवले गेले. त्यांनी कसून शोध घेतला; पण त्यांना काही त्याचा ठावठिकाणा लागला नाही.
अखेरीस, अॅनड्रोक्लस राहत होता त्या जंगलात ते आले. असे झाले की, नेमके त्या दिवशी अॅन्ड्रोक्लस
एकटाच बाहेर गेला होता. आणि सिंह गुहेपाशी विश्रांती घेत होता. त्यामुळे ते दोघेही सैनिकांच्या तावडीत सापडले. सैनिक त्यांना घेऊन शहरात परतले. त्यांनी अॅनड्रोक्लसला साखळीने बांधून तुरुंगात डांबले
आणि सिंहाला पिंजऱ्यात कोंडले.त्या काळी, गंभीर गुन्हा केलेल्या माणसालाशिक्षा म्हणून जंगली श्वापदाच्या तोंडी दिले जाई.आपल्या मालकापासून पळून जाणे हा अतिशय गंभीर गुन्हा समजला जाई. त्यामुळे, अनड्रोक्लसलाही जंगली प्राण्याच्या तोंडी देण्यात येणार होते. ठरलेल्या दिवशी, राजा सर्कशीच्या स्थळी आला
आणि स्थानापन्न झाला. उपस्थित समुदायाने एकच जल्लोष केला. तुतारीवादकांनी शिंग फुंकले आणि
अॅन्ड्रोक्लसला रिंगणात आणण्यात आले.
त्याच्या साखळ्या सोडवण्यात आल्या. तो अशक्त आणि दुःखीकष्टी दिसत होता. हा आपल्या आयुष्यातला
शेवटचा दिवस आहे याची त्याला खात्री पटली होती.विरुद्ध बाजूचा दरवाजा उघडण्यात आला आणि तेथून क्रूर, भयंकर अशा सिंहाला रिंगणात सोडण्यात आले. त्याला अनेक दिवस उपाशी ठेवल्यामुळे तो अतिशय चिडलेला वाटत होता. भीतीने अॅन्ड्रोक्लसला ग्रासून टाकले, मात्र तरीही त्याने धैर्य सोडले नाही. अॅन्ड्रोक्लसला पाहता क्षणी सिंह गुरगुरत त्याच्याकडे वेगाने झेपावला. पण अचानक तो थबकला आणि सावकाशपणे पुढे जाऊ लागला. त्याचा सगळा आवेश आणि आक्रमकता नाहीशी झाली. अॅन्ड्रोक्लसनेही त्याला पाहिले आणि दोघा मित्रांनी एकमेकांना ओळखले.सिंह पुन्हा अॅनड्रोकल्सकडे झेपावला आणि त्याच्याजवळ पोहोचल्यावर गुरगुरत आपले नाक त्याच्या अंगाला घासू लागला. ते पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. अॅन्ड्रोक्लसने सिंहाला मिठी मारली.आणि तो मोकळेपणे आणि आनंदाने रडू लागला.
राजासकट सर्व प्रेक्षक हे दृश्य अचंबित होऊन पाहत होते. लोक अॅन्ड्रोक्लसच्या नावाचा गजर करू लागले.आणि त्याची सुटका करण्याची मागणी करू लागले.राजाने सिंहाच्या या विलक्षण वर्तनाबद्दल अॅनड्रोक्लसला विचारले. संपूर्ण हकिकत ऐकल्यानंतर राजादेखील मनुष्य आणि प्राण्यामधील या अनोख्या कृतज्ञता व मैत्रीच्या नात्याने भारावून गेला. त्याने अॅन्ड्रोक्लसची सुटका करण्याचे आदेश दिले. आता यापुढे तो गुलाम राहणार नव्हता.आणखी कोणते इनाम हवे, असे राजाने अॅन्ड्रोक्लसला विचारले, तेव्हा अॅन्ड्रोक्लस म्हणाला की, मला स्वतः साठी काहीही नको; परंतु सिंहाला मुक्त करावे.अशा रितीने दोघे मित्र मुक्त आयुष्य जगण्यासाठी जंगलात परत गेले.
No comments:
Post a Comment