Class 8 th English 4.5- Festivals of North India - Explanation
ईशान्य भारतातील साजरे होणारे सण .
भारताच्या ईशान्येकडील राज्यांत विविध सण कसे साजरे केले जातात, त्यांबद्दल खालील माहिती लक्षपूर्वक वाचा . भारताच्या ईशान्य भागातील सात राज्यांमध्ये वेगवेगळी संस्कृती नांदते. भिन्न जाती आपापले अनोखे सण उत्साहात आणि आनंदात साजरे करीत असतात. येथील बरेचसे सण शेतीवर आधारित आहेत आणि पारंपरिक संगीत व नृत्याशिवाय कोणताही उत्सव येथे साजरा होत नाही.
बिहू हा आसाम राज्याचा प्रमुख सण आहे. समृद्ध हिरवाई आणि अफाट पसरलेली ब्रह्मपुत्रा नदी यांचे वरदान लाभलेल्या आसामच्या लोकांकडे साजऱ्या करण्याजोग्या अनेक गोष्टी आहेत. सर्व धर्माचे, जातींचे आणि जमातींचे लोक हा सण साजरा करतात. बिहू तीन टप्प्यांत साजरा होतो.
1] पहिला टप्पा -जेव्हा सुगीच्या हंगामाची सुरुवात होते;
2] दुसरा टप्पा -पेरणी पूर्ण झाल्यावर आणि
3] तिसरा टप्पा -सुगीचा हंगाम संपताना.
बिहू हा एक आनंददायी नृत्यप्रकार आहे. तरुण स्त्रिया व पुरुष दोघेही यात सहभागी होतात. चपळ पदन्यास आणि हातांच्या हालचाली, हे याचे वैशिष्ट्य आहे. काही वेगळ्या प्रकारची वादये वाजवून या नृत्याचे पारंपरिक संगीत निर्माण केले जाते. जसे-ढोल हे ड्रमसारखे वादय, पेपा हे म्हशीच्या शिंगापासून बनवले जाणारे वायुवादय, झांजा आणि बांबूच्या चिपळ्या (टाळ). याची गाणी अनेक वर्षापासून चालत आलेली आहेत. आसाममध्ये सर्वत्र बिहूच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि त्या बघायला बऱ्याच मोठ्या संख्येने पर्यटक आणि स्थानिक प्रेक्षक येत असतात.
उत्तरेकडे हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या अरुणाचल प्रदेशचा उल्लेख पुराणांत आणि महाभारत यांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. निसर्गाने या प्रदेशातील लोकांना सौंदर्याची अनोखी जाण दिली आहे, जिचे दर्शन त्यांच्या सण-समारंभ, संगीत आणि नृत्यांमधून सार्थपणे होत असते. अरुणाचलच्या काही भागांत लोसर नावाचा नववर्षाचा उत्सव अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. या दिवशी लोक आपल्या घरांची साफसफाई करूनआणि जुन्या गोष्टींचा त्याग करून नव्या वर्षाचे स्वागत करतात.
मणिपूरचा निंगोल चाकौबा नावाचा, माहेरवाशिणी व त्यांचे आईवडील यांच्या नात्याची वीण घट्ट करणारा आणि त्याला नवचैतन्य देणारा असा अनोखा सण आहे. स्त्रिया व त्यांच्या मुलांना या दिवशी सुग्रास भोजन आणि भेटवस्तूंचा अहेर केला जातो. चैरोबा या एप्रिलमध्ये येणाऱ्या मणिपूरच्या नववर्ष उत्सवाच्या काळात लोक आपली घरे स्वच्छ करून ती सजवतात आणि सणासुदीसाठी खास मिष्टान्ने बनवतात. परंपरेचा भाग म्हणून गावकरी जवळच्या डोंगरावर चढून जातात, कारण येथे असा समज आहे की असे केल्याने आयुष्यात वर जाण्यास मदत होते.
मिझोरममध्ये साजरा होणारा एक महत्त्वाचा सण म्हणजे वसंतोत्सव किंवा चपचार कुट. या दिवशी सर्व वयोगटांतील स्त्रीपुरुष, पारंपरिक वेशभूषा परिधान करून, डोक्यांवर पगड्या, आभूषणे घालून लोकनृत्ये करतात आणि पारंपरिक गाणी गातात. सणाच्या या जल्लोशात ड्रम्स, गाँग (थाळीसारखे वाजवले जाणारे वादय) आणि झांजांचा नाद आणखी भर टाकतात!
मेघालयातील गावांमध्ये साजरा केला जाणारा वांगला किंवा शत-ढोल उत्सव हा गारो लोकांचा सर्वात महत्त्वपूर्ण सण आहे. सुगीच्या काळात केलेल्या मेहनतीची सांगता आणि अर्थातच त्यामुळे येणाऱ्या भरघोस पिकांची फलश्रुती म्हणून हा सुगीचा उत्सव साजरा केला जातो. या निमित्ताने केल्या जाणाऱ्या नृत्यात दोन समांतर रांगा तयार केल्या जातात- सणासुदीची वेशभूषा परिधान केलेल्या पुरुषांची एक रांग आणि महिलांची एक रांग. पुरुष ड्रम वाजवतात, तर नर्तकांच्या रांगा तालात एकत्र पुढेमागे करीत नाच करतात.
त्रिपुराच्या सणांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सर्व लोक या उत्सवात सहभागी होतात. यातल्या काही सणांमध्ये सादर केली जाणारी बरीच नृत्ये शिकार, मासेमारी, अन्न गोळा करणे आणि तत्सम गोष्टींचे प्रतिनिधित्व करतात. यातले काही उत्सव बघण्यासाठी देशभरातून लोक येत असतात.
नागालँडमध्ये विविध प्रकारचे, विविध चालीरीती, परंपरा आणि संस्कृतींचे लोक राहतात, जे विविध सण आपापल्या पद्धतीने साजरे करीत असतात. गाणी आणि नृत्ये हा या उत्सवांचा मूळ गाभा असतो, ज्यातून त्यांच्या मौखिक परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवल्या जातात.
मोआस्तु हा कापणीच्या हंगामानंतर मुख्यत्वे खेडोपाडी साजरा होणारा सण आहे. विविधरंगी वेश आणि जंगली डुकराचे सुळे व पिसांनी सजवलेल्या पगड्या डोक्यावर घालून गावकरी लोकसंगीतावर नृत्य करतात. या सातही राज्यांमध्ये क्वचितच एखादा महिना कोणत्याही सणाविना असा जात असेल. बऱ्याचशा सणांना धार्मिक महत्त्व असते आणि या निमित्ताने लोक चांगल्या सुगीच्या हंगामातून आलेल्या भरभराटीसाठी देवाचे आभार मानतात किंवा कोणत्याही आपत्तीपासून संरक्षण मिळावे म्हणून प्रार्थना करतात. याचबरोबर,हे सणसमारंभ सांस्कृतिक आणि कलात्मक उपक्रमांना प्रोत्साहन देत असतात आणि लोकांमधील नैसर्गिक कलाविष्काराला उत्तेजनही देत असतात,व जीवनाचा आनंद घेत असतात .
No comments:
Post a Comment