Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Saturday, 18 October 2025

ओळख शास्त्रज्ञांची - आयुर्वेदाचार्य जीवक

 

ओळख शास्त्रज्ञांची - आयुर्वेदाचार्य जीवक

कोणतीही वनस्पती निरूपयोगी नाही

आयुर्वेदाचार्य जीवक


‘जीवक, तुझं अध्ययन संपलंय' गुरुजींनी जीवकाला सांगितलं.

'मात्र तू एक कर'

‘सांगावं गुरुवर्य...' जीवक हात जोडून म्हणाला.

'तक्षशिलाच्या चार दिशांना जा. एक योजन अंतर भटकून

सगळी वनस्पती बारकाईने पहा आणि त्यातील एक, फक्त एक,

निरुपयोगी वनस्पती माझ्यासाठी घेऊन ये.' गुरुजींनी आज्ञा करताच

जीवक आश्रमातून बाहेर पडला.

इ.स.पू. ६००-५०० या काळात भारतामधे जीवक नावाचा

महान आयुर्वेदाचार्य होऊन गेला. त्याला त्याच्या गुरुनी आश्रमातील अध्ययन पूर्ण झाल्यावर ही आज्ञा केली होती. जीवकाची आई म्हणजे त्या काळातील एक प्रख्यात नर्तिका. तिला एक मुलगा झाला. लोक-लज्जास्तव तिने त्याला सोडून दिले. शिपायांना ते मूल सापडलं. ते त्यांनी राजपूत्र अभयकडे आणून दिलं. राजपूत्राने त्याचा सांभाळ करायचं ठरवलं. त्याचं नाव जीवक ठेवलं त्याने. 


जीवक आठ नऊ वर्षाचा झाला तेव्हा त्याला त्याच्या जन्माविषयी ही कहाणी समजली. तो एका रात्री तेथून निघून गेला. बाहेर पडल्यावर तो तडक तक्षशिला येथे गेला, तक्षशिला हे विद्याभ्यासाचं फार महत्त्वाचं स्थान होतं त्याकाळी. त्याला गुरुच्या आश्रमात आश्रय मिळाला. त्याचं शिक्षण सुरु झालं. जीवक हुशार होता, त्याने आयुर्वेदाचा अभ्यास केला. गुरुजींच्या आज्ञेप्रमाणे जीवकाने आश्रमाचा सगळा परिसर धुंडाळला. सारी लहान मोठी झाडं, वनस्पती त्याने पाहिली, त्याला एकही वनस्पती निरूपयोगी आढळली नाही, जीवक आश्रमात परत आला.

'काय मिळाली एखादी निरुपयोगी वनस्पती?' जीवकाला परत येताच गुरुजींनी विचारलं, जीवक हिरमुसला होता. त्याला एकही तशी वनस्पती मिळाली नव्हती.

'नाही गुरुजी, मी खूप शोध, शोध, शोधलं, पण मला एकही निरुपयोगी वनस्पती सापडली नाही' नम्रपणे जीवकाने सांगितलं.


जीवकाचं हे उत्तर ऐकून गुरुजींना आनंद वाटला. 'शाब्बास, मला याच उत्तराची तुझ्याकडून अपेक्षा होती.' जीवकाची पाठ थोपटत गुरुजी म्हणाले. या धरतीवर उगवणारी प्रत्येक वस्तू, प्रत्येक वनस्पती उपयोगाची असते. औषधी असते. मात्र ते शोधण्याचं काम मानवाचं आहे. गुरुजींकडून निरोप घेऊन जीवक निघाला. तो गावोगावी फिरू लागला. तेथील रुग्णांना औषध देऊ लागला. असाच तो फिरत फिरत उज्जयिनीला आला. उज्जयिनी त्या काळात एक प्रगत राज्य होतं. तेथला राजा बऱ्याच वर्षापासून आजारी होता. अनेकांकडून औषध घेऊन त्याला बरं वाटत नव्हतं. जीवकाची ख्याती ऐकून राजाने त्याला बोलावून घेतलं. औषध देण्याविषयी सांगितलं. राजाला तपासल्यावर औषध द्यायचं जीवकाने ठरवलं. ज्या वनस्पती व वस्तू लागत होत्या त्या त्याने मागून घेतल्या. त्यात होतं शुद्ध तूप.

'काय तूप हवंय ? अहो पण...' शिपायाने विचारलं. 'का ? तूप तर पाहिजेच, त्यातच सगळं हे भस्म, मात्रा, काढा घालायचाय, म्हणजे औषध तयार होईल.' जीवकाने उत्तर दिलं. 'पण आमच्या राजाला तूपाची घृणा आहे. त्यांना ते मुळीच आवडत नाही.' भीत भीत शिपाई म्हणाला.

'हे पहा औषध म्हणजे औषध, त्यात हे आवडत नाही अन ते चालत नाही असं करता येणार नाही, आणा बरं सगळ्या वस्तू....' तूप घालून औषध तयार झालं, राजाने ते घेतलं मात्र, अन त्याला संशय आला. तूप घातलं होतं त्या औषधात? कुठाय तो आयुर्वेदाचार्य? पकडून आणा त्याला,' राजाने हुकूम दिला. जीवकाचं आता काही खरं नव्हतं. पण जीवक होता कुठे त्या नगरात? तो तर केव्हाच दुसऱ्या गावी निघून गेला होता. 


राजाचे शिपाई त्याला पकडण्यासाठी गेले. ‘घ्या, हे घ्या तुम्ही ...' आपल्या समोरचा एक बेहडा जीवकाने त्या शिपायाला खाण्यासाठी दिला. जीवकही बेहडा खात बसला होता. बेहडा खाताच शिपायाचं पोट काही वेळानं दुखू लागलं, तो गडबडा लोळू लागला. वाचवा वाचवा म्हणू लागला. 'अरे तुला काय झालं? मी पण तर बेहडे खात होतो. मला नाही काही झालं ते?' जीवक म्हणाला. 'मला वाचवा होs' जीवकाला बेहडा खाल्ल्यावर पोट दुखतं हे ठाऊक होतं. त्याचप्रमाणे त्यावर उतार करण्यासाठी दुसरी कोणती औषधयोजना करायची हेही ठाऊक होतं. 


'ठीक आहे, मी औषध देतो पण एका अटीवर.'

'सांगा, सांगा मला ती अट मान्य आहे.'

'मला पकडायचं नाही अन राजाकडे न्यायचं नाही, आहे

कबूल?' जीवकाने दरडावून सांगितलं. शिपायाला वेदना सहन होत नव्हत्या त्याने जीवकाची अट मान्य केली. जीवकाने चटकन एक औषध देऊन शिपायाला बरं केलं. हे सगळं घडेपर्यंत काही वेळ गेला होता. तेच तर जीवकाला पाहिजे होतं. इकडे औषध घेतल्यामुळे राजाला बरं वाटलं होतं. त्यामुळे तो आनंदीत झाला होता. जीवकाला पकडून आणण्यास सांगितलं हे चुकलं याची त्याला जाणीव झाली. त्याने दुसरा शिपाई पाठवला. त्या शिपायाबरोबर मात्र जीवकासाठी एक उत्तम भेट पाठवली होती!


जीवक मग त्याच्या पुढल्या मुक्कामाला निघून गेला. जीवक हा भगवान गौतम बुद्धाचा समकालीन होता. एकदा भगवानांना बरं नव्हतं, पोटात दुखत होतं. खूप यातना होत होत्या. जीवकाला हे समजलं. तो भगवानाकडे गेला, त्यांनाही त्याने औषध दिलं. भगवानांना लवकर बरं वाटलं. त्यानंतर जीवकाने बुद्धाची अनेक वर्ष चिकित्सक म्हणून सेवा केली. निसर्गाने, निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट उपयुक्त असते, ती निरूपयोगी आहे म्हणून नष्ट करणे ही फार मोठी चूक आहे.

No comments:

Post a Comment